पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला. वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सांगून हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतच्या लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालयामध्ये या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच किरण दशवंत, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण, ग्रामसेवक प्रमोद ठोके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 1500 हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मल्हारपेठ ग्रामपंचायतने डिजिटल नेमप्लेट आणि क्यू आर कोड प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल युगाकडे झेप घेतली आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामप्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनेल. लोकांना विविध प्रकारच्या सेवांसाठी ग्रामपंचायतमध्ये हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांच्या वेळ आणि पैसा यांचीही बचत होईल असेही सांगितले.