कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव त्रुटी पूर्ण करून तातडीने मंजूर करावेत. तसेच क्षुल्लक त्रुटी काढून असे प्रस्ताव नाकारणे योग्य नसून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिल्या.
मंत्रालयात कोव्हिड – १९ मुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत बैठक पार पडली, त्यावेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.
वारंवार एकाच प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करून सदर प्रस्ताव नाकारणे योग्य नसल्याचे सांगून राज्यमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले की, या बाबत सदर कर्मचारी कोविड साथीच्या काळात कर्तव्यावर होता का, त्याचा मृत्यू कोविडने झाला का इतक्याच बाबींची तपासणी योग्य आहे. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी याबाबत प्रमाणपत्र दिले आहे असे सर्व प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही संबंधित विभागाने तातडीने करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.