सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार अशी विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून सातारा जिल्हा पर्यटन हब करुन जिल्ह्याला आर्थिक चालना देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र स्थापना दिनिानिमित्त पालकमंत्री देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, सर्वच क्षेत्रातील एक उज्वल परंपरा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे अभिमानाने नाव घेतले जाते. राज्याच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. परकीय गुंतवणूकीसाठी उद्योजकांचे पसंती असणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर नेहण्याचा प्रयत्न त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही करीत आहोत.
पुर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक कामासाठी, पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु, जिल्ह्यात कृषी, आद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल आहेत. कोयना धरण बांधले या धरणाच्या 67 टक्के पाण्यावर 2 हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरु करुन सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला वीज दिली. कोयना काठच्या शेतकऱ्यांना एकही रुपयान न घेता पाणी देण्याचा निर्णय महसूल विभागच्या माध्यमातून स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतला. औद्योगिक प्रगतीच्याबाबतीत सातारा जिल्हा नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. तसेच सातारा जिल्हा हा डोंगरी जिल्हा आहे. या डोंगरी भागात शेती सिंचनासाठी साठवण हौद आणि वळण बंधाऱ्यांची काम येत्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.