देशात युवांचा संख्या मोठी आहे. त्यांना योग्य कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनवणे आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या माध्यमातून देश कौशल्याची राजधानी होऊ शकतो. यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद कार्य करत आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी क्षमता वृद्धी महत्त्वाची असल्याचे मत, सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय कौशल्य विकास विभाग व राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे आयोजित ‘क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक तज्ज्ञांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कर्नल गुंजन चौधरी, एनडीएचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश पांडे, केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे सह संचालक नवीन कुमार आणि उप संचालक श्री.जिग्नेश यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कौशल्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्थान महत्त्वाचे असून त्यामध्ये प्रशिक्षण भविष्यासाठी उपयुक्त असल्याचे नीना पाहुजा यांनी सांगितले. तर कौशल्य विकास केंद्र सुरू करणे त्याचे संचालन करणे या विषयी कर्नल चौधरी यांनी माहिती दिली. श्री. कुमार यांनी केंद्रीय कौशल्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. तर श्री. पांडे यांनी (अपार)विषयी सादरीकरण केले.