महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाकडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर केंब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ आणि राज्याच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी स्वाक्षरी केली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, मुख्यमंत्री कार्यालयाचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, केंब्रिजच्या दक्षिण आशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यावसायिक प्रमुख मनीष दोषी आदी यावेळी उपस्थित होते.