पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारा महाबळेश्वर येथे आयोजित ‘महापर्यटन उत्सव-२०२५’चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

पर्यटन महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचे सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचे आहे. शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर मिलाफ महाबळेश्वर येथे पाहायला मिळतो. निसर्गाने सुंदर पश्चिम घाट आपल्याला दिला आहे, ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला आहे, अनेक सुंदर, पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्याकडे आहेत, हे सौंदर्य देश-परदेशात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि हा महोत्सव त्यादृष्टीने महत्वाचा आहे.

महाबळेश्वर देशातील उत्तम पर्यटनस्थळ

महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील स्कुबा डायव्हिंगसारख्या नव्या कल्पना पुढे आणून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना बॅकवॉटर संबंधी असणारी बंधने दूर केल्याने तेथे चांगली पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *