आई-मुलीच्या नात्याची सुंदर सादमायरा स्वप्नील जोशीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण  अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणे प्रदर्शित

आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी नेहमीच आपल्या आईचं  अनुकरण करत असते. तिचं वागणं  बोलणं, घराची काळजी घेणं आणि कधी आई घरी नसली तर तिच्या जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडलं आहे. ‘सांग आई’ हे अवधूत गुप्ते यांचं नवीन गाणं संगीतप्रेमींसाठी नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं त्यांच्या ‘आई’ या अल्बममधील अखेरचं गाणं आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या गाण्याचं  संगीत अवधूत गुप्ते यांचं असून, अर्थपूर्ण शब्द प्रशांत मडपुवार यांनी लिहिले आहेत. या हृदयस्पर्शी गाण्याचं संगीत संयोजन अनुराग गोडबोले यांनी केलं आहे. ‘सांग आई’चं दिग्दर्शन शोनील यलट्टीकर यांनी केलं असून, यात पूर्णिमा डे आणि मायरा स्वप्नील जोशी मायलेकीच्या भूमिकेत दिसत आहेत. या गाण्याच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांची मुलगी मायरा जोशी हिने मनोरंजन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. वडिलांकडून अभिनयाचा वारसा लाभलेल्या मायराने आपल्या पहिल्याच कामात संवेदनशील अभिनय सादर करून रसिकांचे लक्ष वेधले आहे. तिचा चेहर्‍यावरचा भाव, सहज अभिनय, आणि आई-मुलीच्या बंधाचा उत्कट भाव मांडण्याची पद्धत खरोखर कौतुकास्पद आहे.

‘सांग आई’बद्दल भावना व्यक्त करताना अवधूत गुप्ते म्हणतात, “आई-मुलीचं नातं बघताना मला अनेक भावनिक क्षण आठवतात. ‘सांग आई’ हे गाणं माझ्या मनापासून आलं आहे. स्वप्नील जोशीची मुलगी मायरा हिला या गाण्यात घेण्यामागचं कारणही भावनिक आहे. मायरा ही गाण्यासाठी योग्य निवड होती कारण तिच्या डोळ्यांत गोड भाव आहे आणि ती नैसर्गिक अभिनय करते.  स्वप्नील हा केवळ माझा चांगला अभिनेता नाही, तर एक संवेदनशील वडीलही आहे. मायरा त्याच्याच गुणांचा वारसा घेऊन आली आहे. त्यामुळे ‘सांग आई’ साठी ती परिपूर्ण होती. आईचं अनुकरण करताना मुलीमध्ये निर्माण होणारी ती भावना, ती साद घालायचा मी प्रयत्न केला आहे.

या गाण्याचे बोल जितके भावनिक आहे. तितकेच त्याचे सादरीकरणही खूपच कमाल आहे. सुंदर छायाचित्रण, सौंदर्यपूर्ण फ्रेम्स आणि हृदयस्पर्शी संगीताने हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच भावणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *